मी मागे नसतानाही,

असल्याचा भास होतो ना तुला!


लोकांशी महत्वाचं बोलतानाही


माझा जोक आठवतो ना तुला!


आपण गर्दीत चालतानाही,


माझ्यासोबत एकांत जाणवतो ना तुला!


इतरांसोबत जोरात हसतानाही,


माझा दुरावा रडवतो ना तुला!


कधी उदास वाटतानाही,


माझा चेहरा हसवतो ना तुला!


तुला नको असतानाही,


माझा आवाज लाजवतो ना तुला!


तू शब्दांनी नाकारतानाही


चेहराच सांगतो ना


मी आवडतो तुला! 




मी बारावीला असतानाची गोष्ट आहे… 

नुकतेच सतरा पूर्ण केले होते. मनात प्रेम भावना फुलून आल्या होत्या… 


नेहमीप्रमाणे क्लासला गेलो


… 


आज पहिलंच लेक्चर! माझा नावडता विषय! मॅथेमॅटिक्स! आय जस्ट हेट इट!! मला मॅथेमॅटिक्स नकोच होतं… पण बाबांच्या आग्रहामुळे घ्यावं लागलं…




आज शिकवायला हा कोण नवीन आहे?... पोरगा दिसतोय!... आता हा काय दिवे लावणार आहे काय माहित!...




"प्रिया कोण आहे हा नवीन?" 


"नाव माहीत नाही… नुकताच बीएससी झालाय म्हणे" 


"प्रिया! पण हीरो आहे ना! हायsss किस चक्की का अटा खाते होs" 


"शट अप! लाज कशी वाटत नाही ग तुला?" 


मी अणि प्रिया खुदकन हसलो अणि हसू दाबून समोर बघायला लागलो. 


… 


 


"क्लास! आज आपण इंटिग्रेशन सुरू करतोय" 


ओह माय गॉड! काय आवाज आहे… त्या आवाजाने कलेजा खल्लास झाला माझा! मी त्या आवाजाच्या प्रेमात पडले…


"मिस! मिस!! कुठे लक्ष आहे तुमचं?"


मलाच काहीतरी म्हणत होता तो…


"अं! काय! येस सर" 


"अहो काय येस सर म्हणताय? मी काय विचारलं?" 


मी फक्त मान खाली घालून उभी राहिले… डोळे मात्र त्याच्यावरच रोखलेले… शीटss! पहिल्याच दिवशी इंप्रेशन डाऊन!! नेमकं मलाच विचारलं काहीतरी! खडूस!! 


… 


 


"प्रिया! चल ना जरा त्या खडूसकडं. काहितरी डिफिकल्टि विचारुन येऊ! जरा इंप्रेशन मॅनेज केलं पाहिजे"


"अग बाई! वेडी का तू? खडूस काय म्हणते?" 


"मग काय? पहिल्याच दिवशी मला टार्गेट केलं" 


… 


 


आज तो मला दहा वर्षांनी दिसला…


फार काही बदलला नव्हता… 


आज अचानक त्याला सोशल मीडिया वर पाहिलं अणि जुन्या आठवणी उफाळून आल्या…  


 


मी बारावी झाल्यावर मेडिकलला गेले अणि हा एमएससी करायला… 


आमची किती छान लव्ह स्टोरी चालली होती… 


तो अणि मी, कॉलेज नंतर रोज भेटायचो… 


तो खूप फोकस्ड होता… मला पण छान गाइड करायचा… छान लाइफ स्किल्स बद्दल बोलायचा…


"तुला माहित आहे का? मला कधीकधी तुझी भीती वाटते?" 


"का?" त्याने आश्चर्याने विचारलं


"तू एव्हढा मॅचुअर्ड! अणि मी ही अशी! तू केव्हढा शांत असतोस अणि मी बडबडी! मी दहा वेळा तुला आय लव्ह यू म्हणाले अणि तू फक्त मी टू म्हणतोस. आजपर्यंत आय लव्ह यू सुद्धा डायरेक्ट कधी म्हणाला नाहीस" 


तो जोरजोरात हसायला लागला… 


"खरं सांग! बालिश म्हणून विसरून जाणार नाहीस ना?... मी जास्त एक्सप्रेसीव्ह आहे रे"


शेवटी तो आपल्या हातातली सिगरेट माझ्या ओठात कोंबायचा… मला जोरात ठसका लागायचा अणि माझं बोलणं थांबायचं… ही त्याची टॅक्ट होती माझी बडबड बंद करायला. 


… 


 


मी मेडिकलच्या थर्ड ईयरला असतानाची गोष्ट आहे… 


"मला पीएच.डी करता एमआयटी मधे ॲडमीशन मिळाली आहे"


"ग्रेट!"


"आपण आता दोन तीन वर्ष नाही भेटू शकणार" 


"का? मी पुण्यात आहे अणि तू पुण्यात! मग का भेटणार नाही?" 


तो जोरात हसायला लागला… 


"अगं बाई एमआयटी म्हणजे मॅसेच्युसेट्स इंस्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी! अमेरिकेत" 


"वॉव! भारीsss! तू अमेरिकेत चाललाय"


पण दुसर्‍या क्षणाला माझा चेहरा पडला "म्हणजे आपण तीन वर्ष नाही भेटणार?"


"हो ना!"


"नाही! मला ते माहित नाही! मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत" 


"आय नो" 


"माझं मेडिकल गेलं खड्ड्यात! चल आपण लग्न करू. तू मला पण बरोबर घेऊन चल" 


तो हसायला लागला… 


"तिकडे तुझी काळजी घ्यायला कोणीतरी हवंच! मी येते! रोज स्वैपाक पण करेन म्हणजे तुझ्या जेवणाचा प्रश्न सुटला. बघ माझ्याकडे सगळी उत्तरं आहेत"


"मला नोकरी नाही! मी कमवत नाही. मग दोघांनी खायचं काय?"


"ते तिकडे गेल्यावर बघता येईल"


"तुझ्या आई बाबांना चालेल?" त्याने हसून विचारलं 


"नाही चालणार!"


"मग"


"त्यांना सांगतंय कोण?"


"म्हणजे?"


"लग्न करून तू मला अमेरिकला पळवून ने! मी तिकडे जाऊन घरी फोन करुन सांगते की आम्ही लग्न केलंय अणि आम्ही अमेरिकेत आहोत. 


ते इकडे येऊ सुद्धा शकणार नाहीत. कसली भारी लव्ह स्टोरी असेल आपली. मग पेपरला बातमी असेल की एक प्रेमी युगल लग्न करून अमेरिकेत पळाले. वॉव! कसलं रोमँटिक!"


"ए हेरॉईन! फिल्मी दुनियेतून जागे व्हा"


… 


 


तो गेला अमेरिकेला! 


मी डॉक्टर झाले… 


घरचे लग्नाच्या मागे लागले…


मी माझ्या अणि त्याच्याबद्दल घरी सगळं सांगितलं… पण आई बाबा तयार नव्हते! 


त्यांनी हट्टाने माझे लग्न दुसरीकडे ठरवलं… अणि त्याक्षणी मी घर सोडायचा निर्णय घेतला… 


ऑस्ट्रेलिया रॉयल कॉलेज ऑफ मेडिसिनला अ‍प्लाय केलं! 


 


 


आता असं झालं की तो अमेरिकेत अणि मी ऑस्ट्रेलिया मधे! 


त्याला मेल वर कळवलं… 


तो अमेरिकेतून भारतात आला. पण त्याला ऑस्ट्रेलियाला येणं जमलं नाही अणि मला इतक्या लवकर ऑस्ट्रेलियाहून भारतात जाणं शक्य नव्हतं…




माहीत नाही काय झालं ते! 


त्याचे मेल… फोन येणंही बंद झालं… मी पाठवलेल्या मेलला उत्तरं येणं बंद! 


एकामागून एक दिवस, आठवडे, महिने अणि वर्ष पलटली 


 


… आज दहा वर्षांनी तो दिसतोय. 


… 


 


होता तसाच आहे! 


फार फरक नाही पडला…


अजून चेहर्‍यावर चाळिशीच्या रेषा नाही आल्यात! 


"अरे! इथे त्याचा मोबाईल नंबर आहे की! फोन करते त्याला… पण नको!... त्याच्या बायकोने रीसीव्ह केला तर माझी ओळख काय म्हणून देऊ?... अरेऽ! हे कायऽऽ! अजून सिंगल आहे? स्टेटस तरी सिंगल म्हणुन आहे" 


 


"हॅलो" 


अजून त्याचा आवाज तसाच आहे… 


"हॅलो! मी बोलतेय! ओळखलंस?" 


"तूss? कुठे आहेस?"


"सद्ध्या पुण्यात… तू?"


"पुण्यातच!"


"आत्ता भेटूया! नेहमीच्या ठिकाणी"


"मी अर्ध्या तासात पोहोचतो'"


 


त्याला समोर बघून माझ्या डोळ्यात पाणी आलं… 


त्याला घट्ट मिठी मारावीशी वाटली… 


मला बघायचं होतं की त्या मिठीतलं प्रेम अणि ऊब इतक्या वर्षांनी तसंच आहे का बदललं? 


"हाय! कसा आहेस?"


"छान! तू कशी आहेस?" 


"ठीक!... एक विचारू?"


"तुला परवानगी केंव्हा पासून लागायला लागली?"


"माहीत नाही का ते? तरी विचारलं" 


"बोल" 


"अजून सिंगल?" 


"दूसरी कुणी मनाला भावली नाही" 


"माझी कमतरता कधी जाणवली?" 


"माझ्या प्रत्येक आनंदाच्या क्षणी" 


"मी सुद्धा सिंगल आहे. अजूनही तुझी वाट पहात आहे" 


"म्हणजे? मला कळलं की तुझं लग्न झालं… म्हणुन मी मेल वैगेरे नाही केले"


"कसं करीन लग्न? अणि ते सुद्धा दुसर्‍या कुणाशी?" 


"का अणि कशासाठी थांबलीस एव्हढं?"


"जो पहिला आहे त्यानेच अजून आय लव्ह यू म्हंटले नाहिये… ना माझ्या आय लव्ह यूचे उत्तर दिलंय… त्यामुळे त्याचा निर्णय माहीत नाही… म्हणून त्याचीच वाट बघत आहे" 




त्या

ने दोन्ही हात पुढे केले… मी वेड्यासारखी मिठी मारली आणि रडायला लागले… त्याने डोक्यावरुन हात फिरवला… आणि कपाळावर किस केलं… 




जाणवलं! त्या स्पर्शातून… 


मिठीतली ऊब… प्रेम अणि आश्वासकता तशीच होती… 


तो का सिंगल आहे ह्याचं उत्तर मिळालं होतं मला!!